मुख्य आरोपींचा शोध सुरू
| पेण | प्रतिनिधी |
उद्योजक मयुर वनगे मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून पोलीस ठाण्यात नोंद असले मंगेश रघुनाथ दळवी, हरेश कृष्णा दळवी, रूपेश कृष्णा दळवी आणि रंजीत दळवी (सर्व रा. मांगरूळ) हे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांच्या ताब्यात आलेले नसल्याने पेण शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी मंगेश रघुनाथ दळवी हे भाजपचे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष असल्याने तपासाबाबत राजकीय दबाव असल्याची चर्चा काही स्तरांतून होत आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या संदर्भात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश रजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केले असून युद्धपातळीवर त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, आरोपींकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या मारहाणीच्या घटनेत रिव्हॉल्व्हरचा वापर झाल्याचा गंभीर आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे. या आरोपांची सत्यता, प्रत्यक्षात रिव्हॉल्व्हरचा वापर झाला होता का आणि झाला असल्यास संबंधित शस्त्र कुठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत. या सर्व बाबींचा तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध आणि पोलीस कारवाईकडे पेणसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.






