तटकरेंच्या वाढत्या प्रभावाची धास्ती दळवींना?; शिंदे गटातील वरिष्ठांची तटकरेंसोबतची जवळीक झोंबली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खा. सुनील तटकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडताना आमदार महेंद्र दळवींच्या वक्तव्यांचा रोख आता स्वकीय नेतृत्वाकडेही वळू लागला आहे. तटकरेंचा वाढता राजकीय प्रभाव, शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांची त्यांच्याशी वाढती जवळीक आणि महायुतीतील बदलती समीकरणे दळवींना झोंबत आहेत का? तटकरेंना विरोध करताना वारंवार स्वकीयांनाच सवाल करण्याची वेळ का येत आहे? तटकरेंच्या राजकीय प्रभावाची धास्ती की स्वतःच्या राजकीय अपेक्षांची धग भंग पावत असल्याची जाणीव दळवींना झाली असून, आपला कार्यक्रम होणार असल्याची चिंता वाढली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांचे तटकरे प्रेम त्यांना झोंबले असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले आहे.
कोकणची विधान परिषदेची हक्काची जागा वरिष्ठांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. महाराष्ट्रात शिंदे सेनेच्या पाच जागा असताना कोकणची जागा सोडावी लागली, हे कोकणवासियांचे दुर्दैव असल्याचे दळवींनी म्हटले. या निर्णयात मंत्री उदय सामंत यांची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यांचे तटकरे कुटुंबियांवरील ‘प्रेम’ उतू आले होते, अशी टीकाही त्यांनी केली.
पण, प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही. तटकरेंशी स्वकीय नेत्यांची जवळीक वाढत असताना दळवींचा संताप नेमका कुणावर आहे? तटकरेंवर की आपल्या पक्षातील वरिष्ठांवर? कारण, तटकरेंच्या घरी गणपती दर्शनासाठी गेलेल्या मंत्री भरत गोगावले यांच्याबाबतही दळवींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ‘तटकरेंशी जवळीक साधणारे स्वकीयही दळवींच्या निशाण्यावर’ असे चित्र निर्माण झाले आहे.
कोकणची विधान परिषद जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर दळवींची नाराजी सातत्याने समोर आली. त्यांच्या कन्या जुईली दळवी यांच्या उमेदवारीचा मुद्दाही याच संघर्षाच्या केंद्रस्थानी होता. अखेरीस अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार झाले आणि बिनविरोध निवडून आले. या संपूर्ण घडामोडीत तटकरेंचा राजकीय प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला.
मग दळवींच्या मनात नेमकी सल कोणती? कोकणची जागा गेल्याची? तटकरेंच्या वाढत्या प्रभावाची? की आपल्याला अपेक्षित असलेली राजकीय संधी हुकल्याची? राजकारणात पदे आणि संधी बदलत असतात; पण दळवींच्या वक्तव्यांमधून वारंवार ‘आम्हाला न्याय मिळाला नाही’ हा सूर उमटत असल्याने त्यामागे आणखी काही राजकीय गणित आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महायुतीच्या निर्णयप्रक्रियेत तटकरेंचे राजकीय वजन वाढताना दिसत असताना शिंदे गटातील काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंधही अधिक सलोख्याचे होताना दिसत आहेत. भरत गोगावले यांची तटकरेंच्या घरी झालेली गणेशोत्सवातील भेट त्याचे ताजे उदाहरण ठरली. या पार्श्वभूमीवर दळवींची अस्वस्थता आणखी चर्चेचा विषय ठरत आहे.
तटकरेंवर हल्ला चढवताना स्वकीयांवरच प्रश्न उपस्थित करण्याची वेळ का येते? वरिष्ठ नेते तटकरेंच्या जवळ जात असतील तर त्याची दळवींना एवढी खंत का? दळवींचे राजकीय म्हणणे ऐकून घेणारे कमी झाले आहेत का? की तटकरेंच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे आपल्या राजकीय वजनावर परिणाम होईल, अशी धास्ती निर्माण झाली आहे?
रायगडच्या राजकारणात हे प्रश्न आता उघडपणे चर्चिले जात आहेत. तटकरेंवर बाण सोडताना प्रत्येक वेळी स्वकीयांनाच चिमटा बसत असेल, तर या राजकीय नाराजीचा खरा निशाणा तटकरे की स्वतःचेच नेतृत्व? याचे उत्तर दळवींच्याच पुढील भूमिकेतून स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कोणी विचारात घेत नसला तरी हा थयथयाट असाच सुरू राहणार की काय, याविषयी चर्चेला उधाण आले आहे.






