| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात राहणाऱ्या तरुणीचा भाऊ आणि त्याचे मित्र उच्च शिक्षणासाठी स्पेनला जाणार होते. त्यासाठी तरुणी आणि तिचे वडील ऑनलाईन माध्यमातून विमानाची तिकिटे शोधत होते. याचाच फायदा घेत एका सायबर भामट्याने ‘प्रवीण तिवारी’ या नावाने त्यांच्याशी संपर्क साधला. भामट्याने अत्यंत कमी दरात स्पेनची विमान तिकिटे उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने व्हॉट्सॲपद्वारे तिकिटांसाठी आवश्यक असलेली माहिती त्याला पाठविली. त्यानंतर भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात तक्रारदारांनी एकूण 96 हजार 220 रुपये ऑनलाईन वर्ग केले. पैसे मिळाल्यानंतर भामट्याने तक्रारदारांच्या ई-मेलवर विमानाची तिकिटे पाठविली. मात्र, तिकिटांची अधिकृत पद्धतीने पडताळणी केली असता ती सर्व तिकिटे बनावट असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.






