दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव

नाशिक

। नाशिक । वृत्तसंस्था । 

जिल्ह्यात लोकशाहीत धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी  झालेल्या लिलावात  कोट्यवधी रूपयांची बोली लावण्यात आली. अखेर 2 कोटी 5 लाखांत सरपंचपदाचा लिलाव करून उमराणे गावच्या पुढार्‍यांनी लोकशाहीची अक्षरशः हत्या केली. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी लिलाव लावला जात आहे. नंदुरबार खोडामळी गावच्या सरपंच पदाच्या लिलावाची घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यातला उमराणेचा हा प्रकार समोर आला आहे. कांदा बाजार समितीमुळे उमराणे गाव नावारूपाला आले आहे. यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार रितसर गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्‍वर महाराज मंदिर आवारात लिलावात बोली लावण्यात आली.

1 कोटी 11 लाखांपासून सुरु झालेल्या लिलाव हा 2 कोटी 5 लाखावर पोहोचला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. लिलावाचा हा पैसा रामेश्‍वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे.

Exit mobile version