| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या गोरेगावमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये एका महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईचा वनराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. सीआयएसएफ जवानाच्या वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि मृत महिलेच्या दोन मुली असे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वनराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सीआयएसएफ जवानाच्या वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात हाजरा इस्माईल शेख (48) या महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षा चालक सोनू यादव आणि मृत महिलेच्या मुली शाहीन इस्माईल शेख (20), शिरीन शेख (17) असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि.03) मध्यरात्री मालाडच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या सीआयएसएफ जवान धुंधराम यादव यांच्या कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मात्र, सीआयएसएफच्या गाडीतील जवानांनी दारू पिऊन चुकीच्या साईडने कार चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.