। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली कडे जाणाऱ्या रस्त्याच्या आतमध्ये एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
11 एप्रिल रोजी वाकडी ते चिंचवली गावाच्या हद्दीत वनविभागाच्या जागेत एका महिलेचा मृतदेह जळालेला अवस्थेत असल्याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी देखील रात्रीच्या वेळेस घटनास्थळी जाऊन पाहणी केली. फॉरेन्सिक व्हॅन देखील घटनास्थळी दाखल झाली. यावेळी मुख्य रस्त्यापासून जवळपास दीडशे ते दोनशे फूट अंतरावर वनविभागाच्या जागेत एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला. या महिलेची ओळख पटलेली नाही. या महिलेला बाहेरून मारून या ठिकाणी आणून टाकले की याच ठिकाणी तिची हत्या केली आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या महिलेची ओळख पटल्यानंतर तिची हत्या कोणी, कशासाठी आणि कशी केली हे समजणार आहे.






