| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नागाव येथील पीएनपी सायरस पुनावाला सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची निवड गुरुवारी (दि.5) करण्यात आली. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. नवनिर्वाचित सदस्यांना चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व्यक्तीमत्वातील सकारात्मकता, सामाजिक, बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील तळमळ लक्षात घेता या पदांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील दहा जणांची निवड करण्यात आली आहे. कृषीवलच्या संपादक माधवी सावंत तसेच राजकीय, सामाजिक, शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील आवड असणाऱ्या अंजली मोरे, नागावंचे माजी सरपंच निखील मयेकर, राकेश म्हात्रे, निलेश खोत, राहूल गणपत, अमित फुंडे, शरयू अधिकारी, अभिजीत वाळंज, रंजित राऊत यांची शाळा समितीच्या सदस्यपदासाठी निवड करण्यात आली.
यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शेकापचे नेते तथा पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकणचे भाग्यविधाते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या नावाने पीएनपी एज्युकेशन सोसायटी नावाची शिक्षण संस्था सुरु केली. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्याचे काम या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण अधिक चांगले मिळावे, यासाठी नागाव येथे सीबीएसई बोर्डाची पीएनपी सायरस पूनावाला ही अद्ययावत शाळा सुरु केली. जिल्ह्यात आज पीएनपी शिक्षण संस्थेचा विस्तार वाढत आहे. साडेसात हजारहून अधिक विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत असल्याचा आनंद आहे. पीएनपी शिक्षण संस्थेसाठी स्व. फुलगांवकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आज नागाव येथील शाळा समितीच्या सदस्यांची निवड करताना खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. या समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आहेत. या शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या पध्दतीने शिकवित आहेत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समितीच्या सदस्यांंचेही योगदान मोलाचे राहिल, अशा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, लेखापाल अंकित भानुशाली, अकॅडमीक डायरेक्टर राजश्री पाटील, प्रा. निशिकांत कोळसे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह अन्य मान्यवर, शाळेतील प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.







