| नागोठणे | प्रतिनिधी |
इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून. तसेच गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होईल, या भीतीने भारत पेट्रोलियम कंपनीच्या रायगड गॅस एजन्सीच्या नागोठण्यातील कोळीवाडा परिसरलगत असलेल्या बुकिंग ऑफिस समोर गेल्या तीन चार दिवसांपासून गॅस सिलेंडर घेण्यासाठी महिला व पुरुषांची भली मोठी रांग लागत असून गॅस सिलेंडर घेणाऱ्यांची गर्दी उसळली आहे. मात्र गॅस सिलेंडरचा साठा मुबलक स्वरूपात उपलब्ध होत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन रायगड गॅस एजन्सी या गॅस वितरक एजन्सीकडून करण्यात आला आहे.
एरव्ही घरपोच सिलेंडर मिळत असल्याने निश्चिंत असलेले घरातील पुरुष, महिला सकाळीच गॅस एजन्सीच्या ऑफिस बाहेर उभे राहत आहेत. चार-पाच तास, तसेच उन्हाची पर्वा न करता, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसलेल्या या ठिकाणी महिला-पुरुष उभे राहत असल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गर्दीत जर कुणाला उष्माघाताचा त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न गॅस ग्राहकांतून उपस्थित केला जात आहे.
गॅस सिलेंडरसाठी होणाऱ्या या गर्दीमुळे काळाबाजार करणाऱ्यांचे फावले असून काहीजण घरगुती सिलेंडर चढ्या भावाने विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गॅस वितरक कंपनीने लवकरात लवकर या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दुपारी 3 वाजता बंद करण्यात येणारे बुकिंग ऑफिस गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही दिवस का होईना दुपारी 3 नंतर सुरू ठेवावे आणि गॅस सिलेंडर होम डिलिव्हरी करणाऱ्या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आणि ग्राहकांना होणारा त्रास टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.






