पनवेलमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

| पनवेल| प्रतिनिधी|

पनवेल परिसरात पहाटे कामावर जाणाऱ्या तसेच सकाळी फेरफटका मारणाऱ्या महिलांना लक्ष्य करत चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. अवघ्या चार दिवसांत चार स्वतंत्र घटनांमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या साखळ्या हिसकावण्यात आल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे पहाटेच्या पोलीस गस्तीच्या प्रभावीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

२९ जुलै रोजी सकाळी सव्वासहा वाजता नावडे कॉलनीतील सागर स्वीट फरसान दुकानासमोर कामावर जाणाऱ्या २९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावले. झटापटीत मंगळसूत्र तुटल्याने काही भाग घटनास्थळी पडला, तर उर्वरित भाग घेऊन चोरटे पसार झाले.

या घटनेनंतर अवघ्या २० मिनिटांत मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील बारवई गावाच्या पुलाजवळ आणखी एक घटना घडली. दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केले.

३ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेसहा वाजता नवीन पनवेलमधील श्रेयस रुग्णालयासमोर कामावर जाणाऱ्या महिलेच्या मागून रेनकोट घालून आलेल्या दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावली. त्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता खारघर सेक्टर-१२ मधील प्रणाम हॉटेलशेजारी फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीही दोन चोरट्यांनी लंपास केली.
या चारही प्रकरणांची नोंद तळोजा, पनवेल तालुका, खांदेश्वर आणि खारघर पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने तंत्रज्ञानाचा वापर आणि सीसीटीव्ही यंत्रणा वाढविली असली, तरी पहाटेच्या सत्रात महिलांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांना रोखण्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version