पाणीसंकटामुळे पनवेलकर हैराण


। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल परिसरात पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जीर्ण जलवाहिनीमुळे पनवेलमध्ये पाणीबाणी सुरू आहे. वारंवार होणार्‍या गळतीमुळे ’मजीप्र’ला शटडाउन घ्यावे लागते आणि त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होते. सिडकोची अपुरी वितरण यंत्रणादेखील यासाठी तितकीच जबाबदार आहे.
खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल परिसरात मागील काही दिवसांपासून पाणीसमस्या भेडसावते आहे. ’मजीप्र’कडून होणार्‍या शटडाउनमुळे कधी काही तासांसाठी तर कधी तब्बल दोन दिवसांसाठी पुरवठा खंडित केला जातो. ’मजीप्र’कडून वारंवार घेतल्या जाणार्‍या शटडाउनमागे याशिवाय अन्य कोणतेही कारण नसते. 1989मध्ये ’मजीप्र’ने न्हावाशेवा टप्पा 1 ही योजना विकसित केली होती. सध्या या योजनेतून जेएनपीटी आणि पनवेलमधील कळंबोली, खांदा, नवीन पनवेल, पनवेल शहर आदी भागांत पाणीपुरवठा केला जातो. 40 वर्षे जुन्या झालेल्या जलवाहिनीला आठवड्यातून एकदा तरी गळती लागते. अत्यंत जीर्ण झालेल्या जलवाहिनीतील गळती काढताना मागील बाजूचे पाणी गळून जलवाहिनी रिकामी होते. पुरवठा सुरळीत झाल्यानंतर 120 एमएलडी क्षमतेची जलवाहिनी पुन्हा भरण्यासाठी वेळ लागतो आणि शटडाउनचा कालावधी वाढतो. हा प्रकार मागील महिनाभरात अनेकवेळा झाला आहे.
फेब्रुवारीपासून अमृतयोजनेअंतर्गंत टप्पा तीनमध्ये जलवाहिनीसह संपूर्ण यंत्रणा बदलण्याचे काम सुरू आहे. या योजनेला पुढील तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्यामुळे पनवेलकरांच्या माथी पाण्याचा शटडाउन सहन करण्यापलीकडे काहीही पर्याय नाही, अशी स्पष्ट कबुली ’मजीप्र’ची अधिकारी देत आहेत. मागील वर्षभरात ’मजीप्र’ने मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करून 40 टक्के पाण्याची गळती 30 टक्क्यांवर आणण्यात यश मिळवले आहे.

वितरण व्यवस्था असक्षम
अडीच किलोमीटरच्या क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीची गरज असते. मात्र नवीन पनवेल, खांदा कॉलनीत सिडकोच्या पाण्याच्या टाक्या नाहीत. त्यामुळे ’मजीप्र’कडून येणारे पाणी साठवून न ठेवता थेट वितरीत केले जाते. म्हणूनच ’मजीप्र’च्या थेट पम्पिंगच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सिडकोकडून पाणीवितरण सुरळीत होत नाही. मात्र, सिडको पाण्याच्या तुटवड्याबाबत ’मजीप्र’कडे बोट दाखवून चुकांवर पांघरून घालते. कळंबोलीत सिडकोच्या टाक्या असल्यामुळे ’मजीप्र’च्या शटडाउनचा तीव्र परिणाम होत नाही.

जुनी जलवाहिनी असल्यामुळे आम्हाला इच्छा असूनही अनेक ठिकाणी गळती थांबविता येत नाही. तिसर्‍या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या कामाला अजून अवधी असल्यामुळे वारंवार होणारी गळती थांबविण्यासाठी शटडाउन घ्यावाच लागणार आहे.
विजय सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता

Exit mobile version