। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
खेड येथील तीनबत्ती नाका परिसरात नगरपरिषदेसमोर रस्त्यावर बुधवारी(दि.16) पहाटेच्या सुमारास मारुती रिट्झ या गाडीला अचानक आग लागली. गाडीत एक पुरुष व एक मुलगी असे दोघे प्रवासी होते. प्रसंगावधान राखत ते गाडीबाहेर पडल्याने दोघेही सुखरूप बचावले आहेत.आग लागल्यानंतर खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्याच्या कार्यवाहीत फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, सहायक फायरमन जयेश पवार आणि वाहनचालक गजानन जाधव यांनी सहभाग घेतला होता. या आगीत वाहन पूर्णपणे जळले असून घटनास्थळी धुराचे लोट व आगीचे तीव्रतेचे दृश्य भयावह होते. अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.