आदिवासींचा प्रवास ठरतोय जीवघेणा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातून वाहणार्या पेज नदीमध्ये कळंबोली वाडीपासून कवठेवाडीकडे जाण्यासाठी सिमेंट पाईपच्या सहाय्याने फरशी बनविण्यात आली होती. त्या फरशी पुलाचे काही सिमेंट पाईप वाहून गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही वाड्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. त्या फरशी पुलाच्या जागी नवीन पूल बांधल्यास या दोन्ही वाड्यांमधील आदिवासी लोकांना आपल्या नातेवाईकांकडे पाच मिनिटांत पोहोचता येणार आहे. दरम्यान, माजी आमदार सुरेश लाड यांनी त्या ठिकाणी पूल बांधण्यात यावा यासाठी त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या होत्या.
बारमाही वाहणार्या पेज नदीवर नसरापूर ग्रामपंचायतीमधील कळंबोली आणि कशेळे ग्रामपंचायतीमधील कवठेवाडी या दोन गावांना जोडणारा सिमेंट पाईप मोर्या यांच्या सहाय्याने बांधलेला फरशी पूल होता. कळंबोली वाडीच्या गणेश घाट येथे असलेली फरशी पूल निकामी झाला असून, पावसाळ्यात महापुरात फरशी पुलाचे सिमेंट पाईप वाहून गेल्याने या फरशी पुलाचा वापर स्थानिकांना करता येत नाही. त्यात या दोन्ही आदिवासी वाड्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमधील असल्यातरी त्या दोन्ही वाड्यांच्या मध्ये केवळ नदी असून, फरशी पूल तुटल्याने दोन्ही वाड्यांमधील आदिवासी ग्रामस्थांचे येणे-जाणे जवळपास बंद झाले आहे. या दोन्ही आदिवासी वाड्यांमधील लोकांना एकमेकांच्या गावी जायचे असल्याने कळंबोली वाडीमधून अंजप येथे तेथून नेरळ कशेळे राज्यमार्ग रस्त्याने कवठेवाडी येथे जावे लागते. रस्ता मार्गाने सध्याचे हे अंतर साधारण आठ किलोमीटर असून, येऊन-जाऊन हे अंतर साधारण 15 किलोमीटर होत असल्याने स्थानिक लोक आर्थिक परिस्थितीमुळे जाण्याचे टाळू लागले आहेत.
या आदिवासी वाड्या पुन्हा जोडण्यासाठी शासनाने तात्पुरत्या स्वरूपात त्या फरशी पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. फरशी पुलाचे वाहून गेलेले सिमेंट पाईप नव्याने बसविल्यास स्थानिकांची नदी पार करण्याची सोय होऊ शकते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला फारसा खर्चदेखील येणार नाही आणि पावसाळा वगळता आठ महिने त्या फरशी पुलाचा वापर करता येऊ शकतो, अशी सूचना स्थानिक ग्रामस्थ राम कोंडू नाईक यांनी केली आहे. तर, आमच्या आदिवासी लोणचं रस्ता तयार कार्याला शासनाला वेळ नाही, अशी खंत आदिवासी ग्रामस्थ लक्ष्मण हिलम यांनी व्यक्त केली आहे.
माजी आमदारांकडून प्रयत्न
कर्जत विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड यांनी कवठेवाडी आणि कळंबोली वाडी यांना जोडणार्या फरशी पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात यावा यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला केले होते. त्यानंतर बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आदिवासी लोकांचा रस्ता पुलाअभावी बंद झाला आहे, अशी टीका ग्रामस्थ करीत आहेत. बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.