अपुरा औषधसाठा, कर्मचार्यांची वानवा; ग्रामस्थांसह रुग्णांकडून संताप व्यक्त
| रेवदंडा | वार्ताहर |
हद्दीतील 65 हजार लोकसंख्येसाठी नागाव, खानाव, बामणगाव, वावे, चिंचोटी, आग्राव व रामराज या सात उपकेंद्रांचा समावेश असलेल्या रेवदंड्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या असुविधांबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. औषधांचा अपुरा पुरवठा आणि कर्मचार्यांची वानवा असल्याने रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह उपचारासाठी येणार्या रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पंचक्रोशीतील गावे रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागाव, खानाव, बामणगाव, वावे, चिंचोटी, आग्राव व रामराज या सात उपकेंद्रांवर अवलंबून आहेत. शासनाने आरोग्य केंद्र स्मार्ट होण्यासाठी क्रियाशील निर्णय घेतले आहेत. जेणेकरून स्थानिक व ग्रामीण भागातील लोकांना लवकरात लवकर योग्य उपचार मिळावे, यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध अत्याधुनिक उपचाराची साहित्ये, औषधे, कर्मचारीवर्ग, आरोग्य सेविका, डॉक्टर्स आदीची सेवा शासन पुरविते. शिवाय, रूग्णवाहिकासुध्दा प्रत्येक आरोग्य केंद्रात उपलब्ध करण्यात येते.
रेवदंड्यातील या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसतात. तसेच असुविधेबाबत रेवदंडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मुद्दा उपस्थित करून याबाबत आरोग्य खात्याकडे निवेदन देण्यात यावे, अशी मागणी केली होती तसेच रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी कोणीही कर्मचारी नसल्याने फारच पंचाईत होते, तेथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेली जागा अद्यापि भरण्यात आलेली नाही. त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही जागा त्वरित भरण्यात यावी याबाबतचे निवेदन चौल शिवसेनेच्या वतीने आरोग्य खात्यास देण्यात आले आहे. शिवाय, रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सफाई कामगार तसेच शिपाईसुध्दा नसल्याचे आढळून येते. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रासह सात उपकेंद्रांसाठी फक्त चार आरोग्य सेविका आहेत, त्यामुळे आरोग्य सेविकांची कमतरता भासते. त्यामुळे आरोग्य सेविकांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी केली जाते.
रेवदंडा आरोग्य केंद्रात डॉ. धरणकर, डॉ. सोनिया जाधव हे डॉक्टर सेवेत आहेत. नुकतेच रेवदंडा आरोग्य केंद्राच्या इन्चार्ज डॉ. विकासनी चव्हाण यांनी सेवानिवृत्ती घेतल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे, ही जागा त्वरित भरावी, अशीही मागणी आरोग्य खात्याकडे केली जाते. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र व सात उपक्रेंद्रांत एकूण 60 आशाताई सेवा देत आहेत. मात्र, विविध ग्रामपंचायत अंतर्गत घरोघरी जाऊन अहवाल तसेच औषधोपचार देत असतात. या आशाताई किमान दहावी पास असाव्यात, अशी मर्यादा आहे; परंतु काही आशाताई दहावीसुद्धा नसल्याचे आढळतात. परिणामी, औषधोपचार तसेच स्थानिक अहवाल याबाबत काही चुकीचे घडण्याची शक्यता आहे. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंदामार्फत आशाताईंचे शिक्षणाचे सर्टिफिकेट तपासावेत, अन्यथा शैक्षणिक कमतरतेने चुकीचा अहवाल व चुकीचे औषधे दिले जाऊन भविष्यात वेगळी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.