| तळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा अंतर्गत खरीप हंगाम शेतकरी मोहीम तसेच खेती बचाओ अभियान मौजे हनुमान नगर येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महिला शेतकरी गटाचे सदस्य तसेच शेतकरी गट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. जीवन आरेकर, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, रोहा यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या एल निनो जागरूकता मोहिमेअंतर्गत एल निनो या हवामान घटनेची माहिती देण्यात आली. एलनिनोमुळे पावसाचे अनियमित वितरण, काही भागात पर्जन्यमानात घट, पाण्याची टंचाई होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एल निनोच्या संभाव्य परिणामांवर मात करण्यासाठी योग्य वेळेत पेरणी करणे, कमी कालावधीच्या वाणांचा वापर करणे, जलसंधारण उपाययोजना राबविणे, मल्चिंग व सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे, तसेच किड व रोग व्यवस्थापनासाठी नियमित पीक निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी हवामान आधारित कृषी सल्ल्याचा लाभ घेऊन पीक विमा योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले. याशिवाय सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, त्यामध्ये वापरण्यात येणारी विविध वनस्पतींची पाने, त्याची निर्मिती प्रक्रिया तसेच किड व रोग व्यवस्थापनामधील उपयुक्तता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. डॉ. आरेकर यांनी शेतकऱ्यांसमोर दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले व रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात कांबळे, तालुका कृषी अधिकारी, तळा यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान योजना, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण तसेच शेतकरी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास सचिन लोखंडे, शेतकरी गट व महिला शेतकरी गटाचे सदस्य, तसेच गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.







