स्वच्छता राखण्यास महसूल प्रशासन उदासीन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे शासनाचे आदेश असतानाही रोहा तहसील प्रशासनाकडून या आदेशाची पायमल्ली होत असताना दिसून येत आहे. करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या तहसील कार्यालयाच्या दुमजली इमारतीला झुडपांनी विळखा घातला आहे. या झुडपांचा आधार घेऊन कीटक व अन्य दंश करणारे प्राणी कार्यालयात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसराची स्वच्छता राखण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे. त्यामुळे रोहा तहसील कार्यालयाच्या परिसरातील स्वच्छता फक्त कागदावरच असे चित्र दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. कोलाड, तांबडी, खैराळे, सानेगाव या भागातील शेकडो गावे, वाड्यांमधील नागरिकांना उत्पन्न, वय अधिवास व इतर दाखल्यांसह शेतीविषयक कागदपत्रांसाठी रोहा तहसील कार्यालयात यावे लागते. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रोहा तहसील कार्यालयाची इमारत सुस्सज असून, ती दुमजली आहे. पुरवठा, महसूल विभागासह निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, सेतू केंद्र तसेच तहसीलदार यांचे कार्यालय याच इमारतीमध्ये आहे. अद्ययावत असलेल्या इमारतीमध्ये हजारो नागरिकांसह विद्यार्थ्यांची कामानिमित्त ये-जा असते. या इमारतीचा परिसर कायमच नागरिकांनी गजबजलेला असतो. मात्र, परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये तहसील प्रशासन उदासीन ठरल्याचे दिसून आले आहे.
तहसील कार्यालयाच्या बाजूच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे उगविली आहेत. बाजूलाच मातीचा ढिगारा आहे. या ढिगाऱ्यातही लहान-मोठी झाडे आहेत. तसेच इमारतीला लागूनच जनरेटरच्या ठिकाणी वेलींचे झुडूप आहे. मोठ मोठ्या झाडांसह झुडपांनी या इमारतीला विळखा घातला आहे. मागील भागातही झुडपं मोठ्या प्रमाणात आहेत. याच झुडपांच्या बाजूलाच तळमजल्यावर सेतू कार्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या झुडपांचा आधार घेत काही साप व अन्य दंश करणारे प्राणी कार्यालयात घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महसूल प्रशासनाकडून स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.







