| कोलाड | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर एका गरोदर महिलेला लघुशंकेसाठी रुग्णालयातील स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संबंधित महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आरोग्य सेवेसाठी आलेल्या रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णालयातील स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी तसेच देखभालीचा अभाव असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाकडून आरोग्य सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असताना प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची अशी अवस्था असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच रुग्णालयातील स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करून रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले यांच्याकडून करण्यात आली आहे.







