अर्ध्या तासाने गाड्या चालविण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई महानगर क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असताना कर्जत, नेरळ, वांगणी आणि शेलू ही उपनगरे म्हणून विकसित होत आहेत. मात्र, या भागातील प्रवाशांना आजही उपनगरीय लोकलसाठी तब्बल तासभर प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बदलापूर ते कर्जत दरम्यान किमान अर्ध्या तासाने लोकल सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.
मुंबई- पुणे मुख्य मार्गावरील नेरळ, वांगणी आणि शेलू परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असून, रोजंदारी, नोकरी व व्यवसायासाठी मुंबई, ठाणे आणि कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. सकाळी आणि संध्याकाळी उपनगरीय लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असतानाही गेल्या दहा वर्षांत बदलापूर-कर्जत मार्गावर एकही नवीन लोकल वाढविण्यात आलेली नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, दुपार आणि संध्याकाळच्या काही वेळांमध्ये बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकलच्या फेऱ्यांमध्ये 50 मिनिटे ते सव्वा तास इतके मोठे अंतर पडते. त्यामुळे प्रवाशांना स्थानकांवर दीर्घकाळ थांबावे लागते. विशेषतः नोकरीवरून परतणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. कर्जत येथून रात्री पावणे अकरानंतर मुंबईच्या दिशेने उपनगरीय लोकल उपलब्ध नसल्याने उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. किमान मध्यरात्रीसाठी ठाण्यापर्यंत लोकल सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
मुंबई सीएसएमटी येथून अतिरिक्त लोकल चालविणे शक्य नसल्यास ठाणे-कर्जत किंवा कल्याण-कर्जत विशेष लोकल सुरू करण्याचा पर्याय विचारात घ्यावा, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. यामुळे बदलापूरच्या पुढील उपनगरांतील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, मध्य रेल्वेकडून दरवर्षी ऑगस्ट महिन्यात नवीन वेळापत्रक लागू केले जाते. यंदाच्या वेळापत्रकात बदलापूर-कर्जत मार्गावर अतिरिक्त लोकल फेऱ्यांचा समावेश करून प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खासदारांना प्रवाशांचे साकडे
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून बदलापूर-कर्जत मार्गावर अतिरिक्त लोकल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तिसरी व चौथी मार्गिका पूर्ण होण्यास अद्याप बराच कालावधी लागणार असल्याने तत्पूर्वी ठाणे-कर्जत मार्गावर किमान चार अतिरिक्त लोकल सुरू करून लोकलमधील मोठी वेळेची तफावत कमी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.







