54 लाखांच्या निधीअभावी लाभ रखडला; समाजकल्याण विभागाची शासनाकडे मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
समाजातील जातीय भेद कमी करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला रायगडमध्ये निधीअभावी ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील 108 पात्र जोडप्यांना तब्बल 54 लाख रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा असून, समाजकल्याण विभागाने निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी रायगडमधील 108 पात्र जोडपी प्रतीक्षेत आहेत. 4 लाख रुपयांचा निधी उपलब्ध नसल्याने 2026-27 या आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळू शकलेले नाही.
समाजातील अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव कमी करून सामाजिक सलोखा वाढावा, या उद्देशाने शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत पात्र जोडप्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान, तर 2010 पूर्वी विवाह केलेल्या पात्र जोडप्यांना 15 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. या रकमेपैकी 50 टक्के निधी केंद्र सरकार, तर उर्वरित 50 टक्के निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जातो. मागील 2025-26 या वर्षात शासनाकडून 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून 250 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला. मात्र, यंदा निधीअभावी 108 लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असून, त्यांच्यासाठी आवश्यक 54 लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाह योजना कोणासाठी?
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत किंवा शीख धर्मातील दुसरी व्यक्ती यांच्यात विवाह झाल्यास योजना लागू. 6 ऑगस्ट 2004 च्या शासन निर्णयानुसार मागास प्रवर्गांतील आंतरप्रवर्गीय विवाहांनाही योजनेचा लाभ.
योजनेसाठी आवश्यक अटी
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विवाहित जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावी. वैध जात प्रमाणपत्र आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. विवाहावेळी वराचे वय किमान 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.शाळा सोडल्याचे दाखले, दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस आणि जोडप्याचा संयुक्त छायाचित्र आवश्यक.







