लग्नसराईत वाघ्या-मुरळीला मागणी; मानधनातही झाली वाढ
| संगमेश्वर | प्रतिनिधी |
हिंदू धर्मात विवाह समारंभ निर्विघ्नपणे पार पडावेत, यासाठी देवाला साकडे घालण्याची प्राचीन परंपरा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुलधर्म आणि कुलाचारासाठी ‘जागरण-गोंधळ’ घालण्याची प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात असल्याने घराघरांतून कुलदैवत खंडोबाच्या जागरणाचे आणि कुलदेवता तुळजाभवानीच्या गोंधळाचे स्वर घुमू लागले आहेत.
घरातील मुला-मुलीचे लग्न जमले किंवा देव्हाऱ्यातील देव जेजुरीला खंडोबाच्या भेटीला नेऊन आणले की, कुलाचार म्हणून जागरण-गोंधळ घातला जातो. पूर्वी या कार्यासाठी थेट जेजुरीहून वाघ्या-मुरळी येत असत. या विधीमध्ये खंडोबाची तळी भरणे, घटस्थापना आणि पहाटेच्या वेळी लोखंडी कडी असलेले साखळीचे लंगर तोडणे यांसारखे महत्त्वाचे विधी केले जातात. लंगर तोडणे म्हणजे डोक्यावरील जबाबदारीचे ओझे उतरविणे, अशी यामागील धारणा आहे. मागणी वाढल्याने त्यांचे मानधनही वाढले आहे. ही परंपरा केवळ करमणूक नसून श्रद्धेचा भाग असल्याने यजमानही या सादरीकरणात तल्लीन होऊन जातात.
अशी आहे ही परंपरा
रात्री दहाच्या सुमारास जागरणाला सुरुवात होते. कैलास राणा शिवचंद्र मौळी या शंकरस्तुतीने कार्यक्रमाचा प्रारंभ होतो. यामध्ये गण-गौळण, मल्हारी कथन आणि खंडोबा-म्हाळसा-बाणाई यांच्या नाट्यरूपी कथा सादर केल्या जातात. देवाचे लग्न आणि विरह प्रसंग वाघ्या-मुरळी आपल्या गायन व नृत्यातून उभा करतात. पौराणिक कथांचेही सादरीकरण केले जाते.
लग्नसराईचा हा हंगाम आमच्यासाठी उपजीविकेचे मुख्य साधन असतो. श्रद्धेपोटी जागरण-गोंधळ घालणारे आणि कलेसाठी रात्रभर घाम गाळणारे लोककलावंत आता मोजकेच राहिले आहेत, तरीही आम्ही ही परंपरा टिकवून आहोत.
सुरेश तावडे, गोंधळी
जागरण-गोंधळ ही महाराष्ट्राची समृद्ध लोककला आहे. काळानुसार तिचे स्वरूप बदलले असले तरी त्यामागची भावना आजही मूळ आहे. आपली संस्कृती पिढ्यान्पिढ्या समृद्ध राहण्यासाठी या लोककलावंतांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
रवींद्र यादव, अभ्यासक






