| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारपट्टीवर सुरू असलेल्या डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने भांडाफोड केला असून, या कारवाईत ‘रत्न माऊली’सह दोन बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बोटीचा मालक आणि तांडेल अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभागाला हर्णे परिसरात एक मासेमारी बोट इतर बोटींना अवैधरित्या तस्करीचे डिझेल विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 21 एप्रिल 2026 रोजी रात्री समुद्रात शोधमोहीम हाती घेतली. हर्णे किनाऱ्यापासून सुमारे 11 नॉटिकल मैलांवर ‘रत्न माऊली’ ही संशयित बोट आढळून आली. 21 आणि 22 एप्रिलच्या मध्यरात्री ही बोट डिझेल विक्री करत असताना पथकाने रंगेहात पकडली. कारवाईनंतर दोन्ही बोटी दाभोळ जेटीवर आणून त्यांच्या कप्प्यांमध्ये साठवलेले डिझेल जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात ‘रत्न माऊली’ या बोटीमार्फत गेल्या दोन महिन्यांत विविध फेऱ्यांद्वारे सुमारे 300 टनांहून अधिक डिझेलची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटचे जाळे किती व्यापक आहे, याचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष सरकारी वकील शेखर डी. टोणपे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. दापोली येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी 24 एप्रिल 2026 रोजी हा अर्ज मंजूर करत दोघांना कोठडी सुनावली. सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, समुद्रकिनारी किंवा परिसरात तस्करीसारख्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







