| पनवेल | प्रतिनिधी |
विम्याचे अडकलेले पैसे आणि त्यावर मोठा परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने कामोठ्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीला तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव चव्हाण (52) हे कामोठे सेक्टर 21 मध्ये राहणारे असून, ते तळोजा एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीत नोकरी करतात. 2016मध्ये त्यांनी घेतलेल्या क्रेडिट क्नार्डसोबत त्यांना एक इन्शुरन्स पॉलिसी मिळाली होती. चव्हाण यांनी त्या पॉलिसीचा फक्त पहिलाच हप्ता भरला होता. नेमकी याचीच माहिती मिळवून एका सायबर टोळीने वर्षभरापूर्वी आशिष गिडवानी नावाने चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होता. या सायबर चोरट्याने चव्हाण यांना जुन्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीराम लाइफ इन्शुरन्सच्या दोन नवीन पॉलिसी काढण्यास भाग पाडले. या पॉलिसीचे दोन हप्ते भरून घेतल्यानंतर त्या चोरट्याने आपला फोन बंद केला. त्यानंतर जुलै 2025 मध्ये विकास गर्ग नावाच्या दुसऱ्या सायबर चोरट्याने फोन करून श्रीराम लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे काढून देण्याचे आमिष दाखवले. त्याने हे प्रकरण इन्शुरन्स अधिकारी राजीव मनोत्रा आणि सतवीर चव्हाण यांच्याकडे वर्ग केल्याचे भासवले. या भामट्यांनी चव्हाण यांना एकूण 13 लाख 78 हजार 555 रुपये मिळणार असल्याचे सांगितले. ही रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या बहाण्याने चव्हाण यांच्याकडून तब्बल 6 लाख 10 हजार रुपये चोरट्यांनी उकळले आणि आपले फोन बंद केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी सुरुवातीला राष्ट्रीय सायबर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवली आणि त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.







