| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक प्रणील चंद्रकांत बोरकर यांना हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात निखिल पोलेकर (42) रा. बागमांडला याच्याविरोधात अदखलपात्र अपराध अहवाल दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील पथदिवे आणि सार्वजनिक साफसफाईच्या कामावरून संबंधित व्यक्तीचा नगरसेवक बोरकर यांच्यावर राग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच कारणावरून आरोपीने नगरसेवकांना शिवीगाळ करत हात-पाय तोडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर नगरसेवक बोरकर यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नारायण मारुती हिंदोला करीत आहेत.







