खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरु
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जतमध्ये पंतप्रधान येणार म्हणून रस्ता खोदला… पण, पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला आणि रस्त्याचं काम अपूर्णच राहिलं. मात्र, या अपूर्ण रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु आहे.
देशाचे पंतप्रधान येणार म्हणून नवीन रस्ता बनवण्यासाठी सुस्थितीत असलेला कर्जत तालुक्यातील सावळे- हेदवली येथील रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्तीची कामे वेळेत केली जात नसल्याने अनेक अपघात होत आहेत. 24 नोव्हेंबर रोजी सावळे येथील छाया भालचंद्र धुळे या कडाव येथे बाजारहाट करण्यासाठी जात असताना खोदलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात पडून त्यांना अपघात झाला. या अपघातात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, त्यांना उपचारासाठी रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रस्त्यामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, अनेकांना दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या अपघातांना जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी होणार, याकडे सावळे-हेदवली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. खोदकाम करून अपूर्ण अवस्थेत सोडलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला आणि वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही.
पंतप्रधान आले नाहीत आणि रस्ते ही झाले नाहीत..
3 नोव्हेंबर 2026 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने या रस्त्याच्या खोदकामाला बांधकाम विभागाने जलद गतीने 16 ऑक्टोबर 2026 रोजी सुरुवात केली. व अवघ्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण रस्ता खोदून पूर्ण केला. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2026 पर्यंत कोणतेही काम त्या रस्त्यावर करण्यात आले नाही फक्त रस्ता खोदून तसाच सोडून देण्यात आला.
अपघातांची मालिका 27 ऑक्टोबर 2026 रोजी मानिवली येथील रहिवाशी पाहुणे म्हणून हेदवली येथे जात असताना खोदलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पडल्यामुळे त्यांच्या तोंडाला जबर मार लागला आणि त्यांच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाले होते.त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी त्यावेळी कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. सावळे येथील महिला आपल्या मुलीला शाळेत घेऊन जात असताना याच खोदलेल्या रस्त्यांवर पडल्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. अशा अनेक घटना या रस्त्यावर दररोज होत आहेत. तरीही प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून अनेक जीवांशी खेळ सुरू आहे.






