22 महिला रक्षक तैनात; महिला दिनानिमित्त कौतुकाचा वर्षाव
| पनवेल | दिपक घरत |
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला रक्षक समर्थपणे सांभाळत असल्याचे प्रेरणादायी चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून एकूण 22 महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्या पनवेल महानगरपालिका मुख्यालयासह विविध विभागीय कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत.
पनवेल महापालिका मुख्यालय, विविध विभागांची कार्यालये तसेच इतर प्रशासकीय इमारतींमध्ये या महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्या आहेत. कार्यालय परिसरात शिस्त आणि सुरक्षितता राखण्याची जबाबदारी त्या अत्यंत दक्षतेने पार पाडताना दिसत आहेत. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची नोंद घेणे, आवश्यक ती सुरक्षा तपासणी करणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच परिसरात सुव्यवस्था राखणे अशी महत्त्वाची कामे त्या नियमितपणे करत आहेत. महिला सुरक्षा रक्षक आपल्या कर्तव्याबाबत जागरूक असून नागरिकांशी नम्रतेने संवाद साधत सेवा देताना दिसतात. कार्यालयीन वेळेत नागरिकांची मोठी वर्दळ असतानाही त्या संयम राखून परिस्थिती हाताळत सुरक्षेची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत आहेत.
आज महिलांनी प्रशासन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, लष्कर तसेच पोलीस दलासह विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा क्षेत्रातही महिलांचे योगदान दिवसेंदिवस वाढत असून, त्या पुरुषांइतक्याच सक्षमपणे आपली कर्तव्ये पार पाडत असल्याचे या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या या महिला सुरक्षा रक्षकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले जात आहे. त्यांच्या कामामुळे महिलांच्या सक्षमीकरणाचे सकारात्मक उदाहरण समाजासमोर उभे राहिले आहे.
सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना घर आणि काम यामध्ये समतोल राखण्याची कला अवगत असते. त्यामुळे पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात महिला म्हणून कधीही अडथळा येत नाही. मी स्वतः पालिकेच्या नाट्यगृहात कार्यरत आहे. या ठिकाणी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, महिलांमध्ये असलेल्या संयम आणि समतोल राखण्याच्या वृत्तीमुळे येथे होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे आम्हाला शक्य होते.
– मानसी चव्हाण, महिला सुरक्षा रक्षक







