मुख्याधिकारींकडे चौकशीची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषद हद्दीत प्रशासक काळात घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे माथेरान नगरपरिषदेची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. गरज नसताना अनेक निर्णय घेऊन केलेल्या कारभाराची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराबाबत माथेरान नगरपरिषद मधील विरोधी पक्षाने आवाज उठवला आहे. माथेरान नगरपरिषदेत दोन वर्षे प्रशासकल राजवट होती आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात चुकीची कामे झाली असल्याचा शहरात बोलले जात आहे. त्यात हेरिटेज वस्तूंना बांधकाम परवानगी, पालिकेच्या हेरिटेज कार्यालयाची आपत्कालीन म्हणून करण्यात येत असलेली दुरुस्ती, पालिकेने प्रशासक काळात खरेदी केलेले स्वच्छता गृह आणि पाण्याचे शुद्धीकरण संच अशा अनेक प्रकरणी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे माथेरान नागरपरिषद चर्चेत आहे. त्या विरुद्ध माथेरानमधील विरोधी पक्षाने जाब विचारला आहे. मात्र, रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चौकशी होत नसलेल्या माथेरान नगरपरिषद मधील विरोधी पक्षाच्या नगरसेवक यांनी कोकण आयुक्त कार्यालयात जाऊन डॉ. विजय सूर्यवंशी यांना भेटून निवेदन दिले आणि संबंधित विषयाची चर्चा केली.







