सुधागड-पाली | वार्ताहर |
अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पुरविले जाते. तब्बल 15 हजाराहून अधिक लोक या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र अंबा नदीचे पाणी सांडपाणी, शेवाळ व केमिकलमुळे प्रदूषित झाले आहे. शोकांतिका म्हणजे पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत तब्बल 12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना लालफितीत अडकली आहे. ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता देखील आहे.
अंबा नदीच्या पाण्यात पावसाळ्यात गाळ व चिखलाचे प्रमाण अधिक असते. तर नंतर मोठ्या प्रमाणात हिरवळ व शेवाळ असते. साप, मासे, शिंपले नळाद्वारे थेट येतात. तसेच नाले व गटारांमधील प्रदुषित सांडपाणी, रासायनिक कंपन्यांमधील टाकऊ रसायन हे आंबा नदीत सोडले जाते. या बरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदिवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदित निर्माल्य देखील टाकले जाते. यामुळे अंबा नदीचे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित व खराब होते. या सर्वांमुळे पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. असे पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी बहुसंख्य नागरिक अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेत आहेत.
शुद्ध पाणी योजनेची प्रतिक्षा
शासनाने केलेल्या 2008 – 09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणी द्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये हि योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखिल होता. मात्र पालीला ङ्गफबफफ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. पण अजुनही हि योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सर्वच राजकिय पक्ष व त्यांचे पुढारी या योजनेचे निवडणूकी पुरते भांडवल करतांना दिसतात.
वारंवार पाणी टंचाईचे सावट
अंबा नदीजवळील जॅकवेलमध्ये असलेल्या पंपांद्वारे पाणी सरगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते व तेथून सर्व पालीत पाणी पुरवठा केला जातो. तर काही भागात नदीतून थेट पाणी पुरवठा केला जातो. मात्र जॅकवेल ते साठवण टक्या यांच्या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणार्या लहान, जुन्या व जिर्ण झालेल्या जलवाहिन्या, साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुर्या क्षमतेचे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहिन्या, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाई भेडसावते. नळपाणी योजना झाल्यास ही समस्या निकाली निघू शकते.
ही योजना जुनी आहे. नगर पंचायत प्रशासक म्हणून ही योजना अंमलात आणण्यासाठी स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. गुरुवारी (ता.3) आमदार रवींद्र पाटील यांनी संबधीत अधिकार्यांसोबत या योजनेबाबत बैठक देखील घेतली आहे. आम्ही त्यांना यासाठी सर्व सहकार्य करू
दिलीप रायण्णावार, प्रशासक, नगरपंचायत पाली