पालीकरांचे आरोग्या धोक्यात
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
अष्टविनायकातील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पालीत येत असतात. मात्र, वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे पालीकरांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. येथील बाह्यवळणाच्या मार्गाचा प्रस्ताव मंजून होऊन देखील अद्याप लालफितीत अडकलेला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी, रस्त्यांवर धुळ आणि प्रत्येक वळणावर अपघाताची भीती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाली बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव 2010 साली मंजूर झाला होता. भूसंपादनासाठी कोटी कोटींचा निधीही जाहीर झाला. तरीही 2026 मध्ये हा मार्ग अद्याप लालफितीत अडकलेला आहे. पाली शहरातून जाणारी अवजड वाहतूक हीच सर्वात मोठी समस्या ठरली आहे. ट्रक, डंपर आणि अवजड वाहने मंदिराच्या मार्गावरून जात असल्याने स्थानिक नागरिक, भाविक तसेच विद्यार्थी यांना वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि अपघाताचा धोका कायम आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्ग हा फक्त रस्ता नसून शहराच्या श्वासाचा प्रश्न ठरला आहे. या बाबत लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या काळात विकासाच्या गप्पा रंगतात, आश्वासनांची आतषबाजी होते; परंतु, निवडणूक संपली की सगळे विषय गाठोड्यात बांधून पुढच्या निवडणुकीसाठी जपून ठेवले जातात. सुधागड तालुक्याला लाभलेले एक आमदार, एक लोकसभेचे खासदार आणि एक राज्यसभेचा खासदार असूनही पाली बाह्यवळण मार्ग पूर्ण होताना दिसत नाही. हीच खरी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.







