जसखारजवळ उड्डाणपूल खचला; प्रशासन झोपेत, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
| उरण | प्रतिनिधी |
करळ फाटा ते जेएनपीए मार्गावरील उड्डाणपूल हा विकासाचा नव्हे तर, थेट भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मोठ्या गाजावाजात उद्घाटन करून काहीच महिने लोटले नाहीत, तोच जसखार गावाजवळ मंदिरालगतच्या भागात पुलाला भले मोठे भगदाड पडले आहे. “उद्घाटन करा आणि विसरून जा” हीच प्रशासनाची कार्यपद्धती असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.
आयात-निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला हा महत्त्वाचा उड्डाणपूल आता जीवघेणा ठरत आहे. दररोज जड वाहनांची वर्दळ असताना पुलाचा काही भाग खचणे ही केवळ तांत्रिक चूक नसून, सरळ-सरळ निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही पुलावर मलमपट्टी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणजे, दोष माहिती असूनही तो झाकण्याचा प्रयत्न झाला का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जेएनपीए प्रशासनाने घेतलेली संशयास्पद शांतता ही त्यांच्या भूमिकेलाच प्रश्न विचारणारी ठरत आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ही बाब प्रशासनाच्या बेफिकीरीची पराकाष्ठा दर्शवते.
करळ परिसरात राष्ट्रीय महामार्ग 4बी आणि राज्य मार्ग 54 यांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे पुन्हा एकदा कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जसखार गावाला वळसा घालत चौथ्या बंदराला जोडणारा हा मार्ग सुरू होऊन अवघ्या काही काळातच खचला आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, “आधी निकृष्ट काम करा आणि नंतर दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा निधी उकळा” हा नेहमीचा खेळ इथेही सुरू असल्याची टीका नागरिक करत आहेत.
या पुलाच्या बांधकामावेळीच वाद निर्माण झाले होते. काम सुरू असताना जसखार गावातील श्रद्धास्थान असलेल्या रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्या वेळीही प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि आता त्याच निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दरम्यान, काही दिवसांवरच रत्नेश्वरी देवीचा जत्रोत्सव येऊन ठेपला असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. पुलालगतच्या उद्यानामुळेही नागरिकांची वर्दळ वाढते. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? की पुन्हा चौकशी समिती नेमून वेळ मारून नेली जाणार?
मनसेचे स्थानिक पदाधिकारी मंगेश वाजेकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, हा सर्व प्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाईसाठी त्यांची भेट घेण्यात येणार आहे.
फक्त ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून हा प्रकार दडपता येणार नाही. संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी संतप्त मागणी जनतेकडून आता जोर धरत आहे. आज पूल खचतो उद्या व्यवस्था कोसळली तर जबाबदार कोण? हा प्रश्न आता उरणकरांना पडला आहे.






