पॅाझिटिव्ह रुग्णांची थेट कोव्हिड सेंटरला रवानगी

जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना; सीईओ डॉ. किरण पाटील यांनी दिली माहिती
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यातील एकही रुग्ण गृह विलगीकरणात राहणार नाही. रुग्ण कोव्हिड केअर सेंटर व कोव्हिड रुग्णालयांमध्ये उपचार घेतील. यासह सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना अँटीजेन चाचणी करण्यासाठी किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक समिती स्थापन करण्यासह ठिकठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करुन नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.


रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासह स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेऊन कोरोनाचा सामना करण्यात येत आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासोबत नागरिकांनी प्रतिबंधक लस घ्यावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात अँटीजन चाचणी करण्यात येत आहे.
…………….
* कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकही रुग्ण गृह विलगीकरणात राहणार नाही याची खात्री करावी. सर्व रुग्ण कोव्हिड केअर सेंटर, डीसीएचसी आणि डीसीएचमध्ये दाखल करण्यात यावेत.
* सर्व स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यासाठी सामील करावे. त्यांना टेस्ट किट उपलब्ध करुन द्यावेत व रुग्णांची सकारात्मक तसेच नकारात्मक अशा रुग्णांची सीव्ही स्टेटस पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगावे.
* रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे (हाय रिस्क/लो रिस्क) सर्वेक्षण करून त्याची नोंदणी डेटा पोर्टलवर नियमितपणे करण्यात यावी.
* सर्व गांवामध्ये कोरोना प्रतिबंधक समिती स्थापन केली आहे याची खात्री करावी. या समितीच्या माध्यमातून गावपातळीवर विशेष मोहीम उघडून कोरोनाची लक्षणे असणार्‍यांची नियमितपणे चाचणी करणे, कोरोना रुग्ण आढळल्यास कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, मार्गदर्शक सूचनांनुसार गावात आवश्यकतेप्रमाणे छोटे प्रतिबंधक क्षेत्र निर्माण करणे, आशा व अंगणवाडी सेविकांच्या सहाय्याने कोरोनाविषयक व्यापक जनजागृती करणे, गावात कोणत्याही प्रकारचे समारंभ तसेच कार्यक्रम होणार नाहीत याची दक्षता घेणे, नागरिकांकडून नियमितपणे मास्कचा वापर होत असल्याची खात्री करणे, कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणे.
* कोव्हिड केअर सेंटर आणि प्रा.आ. केंद्राचे फायर व इलेक्ट्रिसीटी ऑडिट पूर्ण झाले आहे याची खात्री करावी.
* पोलीस, अंगणवाडी सेविका, दुकानदार, आशा, बचत गटातील सदस्य यासारख्या तसेच फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी विशेष शिबिराद्वारे अँटीजन चाचणी आयोजित केली जावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान 2 ते 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विविध स्त्रोतांद्वारे उपलब्ध करुन घेण्यात यावे.
* स्थानिक विकास निधी व 15 वा वित्त आयोग, रुग्णकल्याण निधी, रुग्णालय देखभाल निधी या विविध स्त्रोतांच्या निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या ठिकाणी बायोमेडिकल बेस्टकरिता स्वतंत्र कचरापेटी, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर सुविधा, अग्निप्रतिबंधक यंत्र, पुश पेंडल सॅनिटायझर यंत्र, इलेक्ट्रीकल वायरिंग, प्रतीक्षालय कक्षातील बसण्यासाठीचे बेच इ. विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन घेण्यात याव्यात.
* नागरिकांना कोरोना उपाचारासाठी येणार्‍या खर्चाची व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची माहिती सर्व प्रा.आ. केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय व खासगी रुग्णालयांमध्ये पोस्टर्सद्वारे लावण्यात यावी.
* लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे व पालन न करणा-यांकडुन सक्तीने दंडाची वसुली करण्यात यावी.
* आशा सेविध व अंगणवाडी सेविका यांच्या सहाय्याने कोरोना प्रतिबंधात्मक कामे करण्यासाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
* कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवर करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांसाठी विशेष नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती संकलित करुन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयास सादर करणे.

Exit mobile version