शेतकऱ्यांना होणार बंधाऱ्याचा फायदा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात यावर्षी पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे शेती पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी नदी नाल्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्याचे आवाहन केले होते. वनराई बंधारे तसेच नद्यांमधील सिमेंट बंधारे दुरुस्त करून त्यात पाणी अडवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत ग्रामपंचायतीमधील बोरगाव येथे उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या सिमेंट बंधाऱ्यात पाणी अडवण्याचे काम स्थानिकांनी श्रमदान करून केले आहे.
पोश्री नदीवर बोरगाव येथे असलेला सिमेंट बंधाऱ्याच्या झडपा बंद करून आजूबाजूने पाणी वाहून जाऊ नये यासाठी सिमेंटचे रिकाम्या पिशव्या मातीने भरून त्या लावण्यात आल्या. त्याचा फायदा येथे बोरगाव येथे पोश्री नदीमध्ये दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पाण्याचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे. या पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना होणार आहे. भाजीपाला शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जाणार असल्याने रोजगार देखील निर्माण होणार आहे. तर पुढील सहा महिने त्या सिमेंट बंधाऱ्यात पाणी साठा होणार असल्याने शेती तसेच जनावरे यांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटला असून स्थानिक नळपाणी योजना देखील सुरळीत चालण्यास मदत होणार आहे.






