| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडस जवळील सुकेवाडी येथील आदिवासी वाडीतील वीज रोहित्र चोरीला गेले आहे. महावितरण कंपनीकडून तेथे वीज पुरवठा व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे गेली सात महिने सुकेवाडी येथील ग्रामस्थ अंधारात आहेत.
खांडस बेलाची वाडी रस्त्यालगत असलेल्या सुकेवाडी या आदिवासी वाडीमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांना गेल्या सात महिन्यापासून विजेविना राहावे लागत आहे. तेथे वीज पुरवठा करणारा वीज रोहित्र चोरीला गेले असून, वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम महावितरणाकडून केले गेले नाही. त्याचा परिणाम तेथे वीज पुरवठा सुरू झालेला नाही. स्थानिक आदिवासी लोकांनी वीज पुरवठा व्हावा आणि वीज पुन्हा आपल्या घरात सुरू व्हावी यासाठी महावितरणच्या कशेळे येथील सहायक अभियंता कार्यालयात जाऊन तक्रार केली. मात्र, चार महिने झाले तरी महावितरणाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. तर आज सात महिने होऊन गेले तरी नवीन वीज रोहित्र आणून बसवण्यात आले नाही आणि त्यामुळे ही आदिवासी वाडी अंधारात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र बंद पडल्यानंतर महावितरण कंपनीकडे तक्रार केली होती. मात्र, महावितरणाकडून बंद पडलेल्या वीज रोहित्र यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही केली नाही आणि त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. महावितरणाकडून वेळीच वीज रोहित्र दुरुस्तीची कार्यवाही केली नसल्याने स्थानिकांना अंधारात रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे घरगुती कामकाज, पाणीपुरवठा व दैनंदिन उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. रात्रीच्या अंधारामुळे महिलांमध्ये, लहान मुलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वीज नसल्यामुळे रस्ते व घरांच्या परिसरात अंधार पसरल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याची भीती
अतिदुर्गम भागात असलेल्या या रोहित्रामधील चोरीमुळे परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. रोहित्र सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Related