| पनवेल | प्रतिनिधी |
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक 2026 निमित्त मंगळवारी (दि.24) राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र, गोवा तसेच दिव आणि दमण विभागातून एकूण 155 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 23 उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामध्ये 5 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. यावेळी सुमारे 1 लाख 90 हजार अधिकृत वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. पनवेल येथेही मतदानासाठी वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. ज्येष्ठ वकील, नवोदित वकील तसेच महिला वकिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान केले. संपूर्ण प्रक्रिया शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.





