वाहतूक कोंडीमुळे निश्चित स्थळी पोहचण्यास विलंब
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील अपूर्ण असलेले बेलकडे ते कुरुळपर्यंतच्या रस्त्याचे काम एमएसआयडीसी मार्फत सुरु करण्यात आले आहे. मात्र पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यास ही यंत्रणा उदासीन ठरल्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना बसत आहे. शनिवार व रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह स्थानिकांना या रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल आहे. निश्चित स्थळी पोहचण्यास पर्यटकांसह स्थानिकांना विलंब होत आहे. त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत असल्याचे बोलले जात आहे.
दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी पडली आहे. सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहे. दिवाळी सुट्टीचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शनिवार व रविवारी पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अलिबागसह नागाव, काशीद अशा अनेक समुद्रकिनारी, अलिबागमधील कुलाबा किल्ला, मुरूडमधील जंजिरा किल्ला अशा अनेक पर्यटन स्थळी फिरण्यासाठी पर्यटक आले आहेत. शनिवारी सकाळी नागाव, आक्षी, रेवदंडा, काशिद, मुरुड अशा समुद्रकिनारी पर्यटक निघाले होते. अलिबाग-रोहा मार्गावरील आक्षी, नागाव तसेच सहाण पाल्हेमार्गे पर्यटकांच्या वाहनांची गर्दी दिसून आली. मात्र कुरुळ ते बेलकडेपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरु झाले आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला आहे. नागाव, बेलकडेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांच्या तीन ते चार किलो मीटर अंतरावर रांगा निर्माण झाल्या आहेत. दहा मिनीटाचे अंतर कापण्यासाठी पाऊण ते एक तास लागत असल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात आले आहे. तासनतास एकाच ठिकाणी ताटकळत राहण्याची वेळ प्रवाशांसह पर्यटकांवर आली.
वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला. परंतु ही कोंडी सोडवितांना त्यांची दमछाक उडाली. अलिबाग-रोहा मार्ग कायमच वर्दळीचा राहिला आहे. या मार्गावरून हजारो वाहनांची ये-जा असते. परंतु सिमेंट काँक्रींटीकरणाचे रस्ते तयार करण्यापुर्वी संबंधित विभागाकडून पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही. त्याचा फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसला आहे.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुरूडला फिरण्यासाठी आलो. कुरुळवरून बेलकडेमार्गे मूरूडकडे जात होतो. कुरुळ ते बेलकडे दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. कुरुळपासून बेलकडेपर्यंतचे सात मिनीटाचे अंतर कापण्यासाठी एक तास आणि त्याहून अधिक वेळ लागला. त्यामुळे निश्चित स्थळी वेळेवर पोहचू शकत नाही.
– अमर पवार, पर्यटक






