। उरण । प्रतिनिधी ।
उरण-मोरा मुख्य रस्त्यावरील बोरी नाका येथे गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठा पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, दररोज हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून वाया जात आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी रस्त्याला चढ-उतार असल्याने वाहने वेगाने ये-जा करतात. त्यात रस्त्यावर सतत पाणी वाहत असल्याने तो निसरडा झाला असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या गंभीर समस्येबाबत उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांना नगरसेविका प्रमिला पवार यांनी लेखी निवेदन देऊन तातडीने लिकेज दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
बोरी नाका परिसरात पाइपलाइनचे लिकेज इतके मोठे आहे की, काँक्रीटच्या रस्त्याखालूनही मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे पाइपलाइनमध्ये आतून मोठी गळती असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे शुद्ध पिण्याचे पाणी हजारो लिटरच्या प्रमाणात रस्त्यावर वाहून जाणे म्हणजे प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह आहे.
या रस्त्यावर वाहने मोठ्या वेगाने धावत असल्याने सतत ओला आणि निसरडा झालेला रस्ता दुचाकीस्वारांसाठी विशेष धोकादायक ठरत आहे. याच परिसरात यापूर्वी दोन गंभीर अपघात होऊन तीन व्यक्तींना जीव गमवावा लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आणखी एखादा जीव गेल्यानंतरच नगरपरिषद प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षभरापासून नागरिकांकडून या लिकेजची माहिती देण्यात येत असूनही अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन नेमके कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
नगरसेविका प्रमिला पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘एखाद्या निष्पाप नागरिकाचा अपघात होऊन बरे-वाईट होण्यापूर्वी युद्धपातळीवर लिकेज दुरुस्त करावे,’ अशी मागणी केली आहे.
पाण्याचा अपव्यय रोखण्याबरोबरच नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे बोरी नाक्यावरील लिकेजकडे आता तरी गांभीर्याने पाहून तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






