परीक्षेची सर्व माहिती देणारे अॅप लॉन्च
। रायगड । प्रतिनिधी ।
विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षाविषयक माहिती व परिपत्रके यांची माहिती मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोबाईल अॅप विकसित केले आहे. एमएसबीएसएचएसई या नावाच्या अॅपमुळे दरवर्षी बोर्डाच्या परीक्षांबात विद्यार्थ्यांत निर्माण होणारे संभ्रम दूर होणार आहेत.
दरवर्षी बोर्डाच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांत संभ्रम असतात. सोशल मीडियावर याबाबत अफवाही पसरवल्या जातात. चुकीचे वेळापत्रक पसरवण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वांना आळा बसावा आणि विद्यार्थी व पालक यांना परीक्षेसह बोर्डाच्या नियमांविषयी योग्य माहिती मिळावी, यासाठी हे अॅप बनविले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी, मार्च 2025 मध्ये होणार्या बारावी, दहावी परीक्षेचे वेळापत्रक आपल्या संकेतस्थळावर 21 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून दिले आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या विषयाच्या तीव्रतेच्या निकषात कोणताही बदल नाही.
बोर्डाने विद्यार्थी, पालक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोयीसाठी हे अॅप बनविले आहे. यात दहावी, बारावी परीक्षेचेच वेळापत्रक, मार्च 2024 परीक्षेच्या ठराविक विषयांच्या प्रश्नपत्रिका, परिपत्रके उपलब्ध करून दिली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळांची माहितीही उपलब्ध करून दिली आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर या नावाने मोफत उपलब्ध आहे. यात विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
संकेतस्थळावर येत होत्या अडचणीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ आहे. मात्र, त्यावर अनेकदा विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे ही नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अॅपवर ठराविक विषयाच्या प्रश्नपत्रिकाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.शाळा, महाविद्यालयांची सोयया अॅपवर शाळा, संस्था व कर्मचार्यांसाठी लॉगिन उपलब्ध करून दिले आहे. यासह नमुना प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, निकाल, विशेष विद्यार्थी आदी बाबी विद्यार्थ्यांसाठी आहेत. तर शुल्क परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक गुण यासह संबंधित बाबी शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर परीक्षा काळात विद्यार्थ्यांना लागणारे प्रमाणपत्र, निकालानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्रांची पडताळणी आदी सुविधाही उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अॅप उपलब्ध करुन दिले आहे. ते दहावी, बारावी विद्यार्थ्यांसह संस्था व कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अॅपमुळे परीक्षा वेळापत्रक, नियम याबाबत संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आळा बसणार आहे. शिवाय विद्यार्थी व कर्मचार्यांसाठी अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी हे अॅप मोबाईलवर इन्स्टॉल करुन या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.