50 झोपड्या जाळून खाक
। मुंबई । प्रतिनिधी ।
मीरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटाने भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून बरेच जण जखमीही झाले आहेत. तर 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.10) रात्रीच्या सुमारास लागली.
मीरा-भाईंदरमधील इंद्रलोक फेज 4 मधील आरक्षित भूखंडावरील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री 8 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे एकापाठोपाठ एक 3 असे सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. काही क्षणातच ही आग वस्तीत पसरली. यामुळे झोपड्या जळून खाक झाल्या आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तोपर्यंत आगीत बरेच जण होरपळले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र यात तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून उत्तर प्रदेशचे गुड्डू राम (46) आणि पश्चिम बंगालचे सुरज लियाकत अली मंडळ (14) आणि रोहित रहेमत अली मंडळ (15) अशी मृतांची नावे आहेत.
आग विझल्यानंतर तपासादरम्यान परिसरात 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्याने खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 24 सिलेंडर जप्त केले. पुढील तपास आता पोलीस करत आहेत.





