| तळा | प्रतिनिधी |
तळा बाजारपेठेत भाजी मंडईची सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील खेड्यापाड्यातून आलेले भाजी विक्रेते रस्त्यावरच भाजीची विक्री करण्यास भाग पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांनाही ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दररोज सकाळी तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी ताजी भाजी घेऊन तळा बाजारपेठेत येतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र भाजी मंडईची व्यवस्था नसल्याने ते रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर आणि मुख्य रस्त्यावरच भाजी मांडून विक्री करतात. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्ता अरुंद होतो, वाहने अडकतात आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे अवघड होते. भाजी विक्रेत्यांचीही यामुळे मोठी गैरसोय होते. उन्हात, पावसात रस्त्यावर बसून भाजी विकावी लागते. त्यांना बसण्यासाठी, भाजी ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना थांबण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्यामुळे त्यांचा व्यवसायही प्रभावित होतो. त्यामुळे तळा नगरपंचायतीने शहरात भाजी मंडईची व्यवस्था करावी, अशी मागणी भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.






