| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल बस स्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापणे, बॅगा लंपास करणे तसेच हातसफाईच्या माध्यमातून चोरी करण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने बस स्थानकाच्या बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. पनवेल बस स्थानकात एसटी महामंडळाच्या माध्यमातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, बस स्थानकाच्या बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने प्रवाशांचे खिसे कापणे, बॅगा पळविणे आणि अन्य चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. बस स्थानकाबाहेर घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासन तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून सीसीटीव्ही बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने लेखी परवानगी दिल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याचा मार्ग मोकळा झाला.






