वाहतूक पोलिसांची दमछाक, प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भाऊबीजेनिमित्त बहिणीकडे जाणाऱ्या भावांचा प्रवास वाहतूक कोंडीतून झाल्याचे चित्र बुधवारी (दि.11) सकाळपासून पहावयास मिळाले. अलिबाग-रोहा मार्गासह पोयनाड अलिबाग रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीत अडकलेल्या भावांना त्यांच्या बहिणीच्या घरी वेळेवर पोहचता आले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अलिबाग-रोहा मार्गावरील कुरुळ ते बेलकडे मार्गावर दोन ते तीन किलो मीटर अंतरावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली.
भाऊबीजेनिमित्त बहिणीकडे जाण्यासाठी भावांनी तयारी केली होती. काहीजण सकाळी सहा वाजता निघाले, काहीजण दहा वाजता घरातून निघाले. बहिणीकडे जाण्याची ओढ प्रचंड होती. मात्र वाहतूक कोंडीमुळे वेळेवर बहिणीच्या घरी पोहचता आले नसल्याने भावांनी वाहतूक व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काहीजण दुचाकी, काहीजण चारचाकी, तर काही जण एसटी बसने निघाले होते. मात्र नागावपासून कुरुळपर्यंत तसेच कुरुळपासून बेलकडेपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासून ही वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडी झाली असताना वाहतूक पोलीस नसल्याने गाडीतील काही तरुणांनी पुढाकार घेत वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतू वाहनांची संख्या प्रचंड वाढली होती. सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची वाहनांची वर्दळही या मार्गावर वाढली होती.अखेर वाहतूक पोलीस यांच्यासह होमगार्ड जवानांनी दुचाकीवरून बेलकडे फाटा गाठला. त्यांनी वाहतूक कोंडी सोडविण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. मात्र ही कोंडी सोडविताना त्यांची प्रचंड दमछाक उडाली. त्यानंतर आणखी वाहतूक पोलीस आले. अखेर शर्तीच्या प्रयत्नाने वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास वाहतूक पोलिसांना यश आले.






