बंगलेधारकांकडून दगडी कुंपण; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद होण्याच्या मार्गावर
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहर हे वन जमिनीवर वसले असून या ठिकाणी असलेली वन संपदा वन्य प्राण्यांचे आदिवास समजला जातो. याच माथेरानमध्ये वन नियम आणि कायदे राज्याच्या अन्य भागापेक्षा वेगळे आहेत. मात्र, सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याची परंपरा मागील काही वर्षात सुरू झाली आहे. दरम्यान, शहराच्या जंगल भागात सध्या वन नियम धाब्यावर बसवून दगडी कुंपण घातली जात आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मार्ग बंद होत असल्याबद्दल आक्षेप घेऊन असे बांधकाम तात्काळ हटवावे आणि संबंधित लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकत्यांकडून केली जात आहे.
ब्रिटिशांनी वसवलेल्या माथेरानमध्ये वन संपदा लक्षात घेऊन कडक कायदे बनवले आहेत. याठिकाणी जंगल भाग मोठ्या प्रमाणात असल्याने जंगली प्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे त्या जंगली प्राण्यांना जंगलात कुठेही फिरताना कोणताही अडथळा येऊ नये, त्यासाठी माथेरानमध्ये वन कायदे आहेत. त्यात कुठेही दगडी बांधकाम करून कुंपण घातले जाऊ नये; तसेच, आपल्या मालकीच्या भुखंडात कुंपण घालून बंदिस्त करू नये, असे सूचित केलेले आहे. मात्र, माथेरानच्या जंगलात सध्या अनधिकृत बांधकाम आणि झाडे तोडून काँक्रीटचे जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, या ठिकाणची झाडे दररोज तोडली जात असून मालकी जागेत दगडी कुंपणे घातली जात आहेत. माथेरानमधील या बंदिस्त कार्यपद्धतीमुळे प्राण्यांना जंगलात सैर करणे देखील कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे येथील जंगलासह प्राणी देखील संकटात आले आहेत.
माथेरानमधील एल्फिन्स्टन रोड भागातील एल्फिस्टन बंगला हा येथील 36 एकर जमिनीच्या क्षेत्रात वसलेला आहे. एवढ्या मोठ्या परिसरात विस्तीर्ण पसरलेली जमीन आणि परिसराला जुन्या झाडांचा विळखा असल्यामुळे हा परिसर प्राण्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे. मात्र, हाच एलफिस्टन बंगला माथेरान नगरपरिषद आणि माथेरान वन विभागाच्या नजरेच्या बाहेर असल्याचे दिसून येत आहे. या 36 एकर जमिनीमध्ये व्यापलेल्या बंगल्यात बहुसंख्य जमीन झाडांनी व्यापली आहे. मंकी पॉईंट रोड ते दरीपर्यंत आणि पुढे टोपीवाला बंगला ते मंकी पॉईंटपर्यंत व्यापला आहे. याच एलफिस्टन बंगल्याचे मालक या ठिकाणी दगडी कुंपण करून हे जंगल बंद करत आहेत. त्यामुळे वन्यजीव व प्राण्यांची वहिवाट बंद होणार आहे. माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असून देखील जंगल हे बंदिस्त झाले तर वन्यजीव प्राण्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी काही प्राणी माथेरान जंगलातून स्थलांतरित होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे वन नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवावे आणि संबंधितांवर मुंबई वन जमीन कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार ही जमीन शासन जमा करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी महसूल अधीक्षक आणि माथेरान नगरपरिषदकडे केली आहे. तर, वन विभाग आपले नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नसल्याने माथेरानमधील जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.






