वरद गावंड यांची जलरंग कलाकृती; सिंगापूर येथील प्रदर्शनासाठी निवड
| उरण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील उरण येथील युवा चित्रकार वरद गावंड यांच्या जलरंग कलाकृतीची सिंगापूर इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा व प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या यशामुळे रायगड जिल्ह्यातील कला क्षेत्रात गौरवाची भावना निर्माण झाली आहे.
ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा व प्रदर्शन दि. 7 ते 10 जून दरम्यान सिंगापूर येथील मॅकफर्सन आर्ट स्टुडिओ येथे होणार असून, कार्यक्रमाचे शीर्षक ‘शालोम पीस (शांती)’ असे आहे. स्पर्धेचा विषय अनिर्बंध असून, 18 वर्षांवरील कलाकारांसाठी गट 3 (उत्कृष्ट समूह) अंतर्गत ही निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी अतनूर डोगान (तुर्की/कॅनडा), हाँग शान (चीन), सुसाना सुन लियान (सिंगापूर) यांच्यासह जगभरातील नामवंत कलाकार व क्युरेटर परीक्षक म्हणून लाभले आहेत.
वरद गावंड हे सध्या देवरुख कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे बॅचलर ऑफ फाईन आर्ट (प्रथम वर्ष) शिक्षण घेत आहेत. त्यांनी साकारलेली ‘द एज ऑफ द स्टॉर्म’ ही कलाकृती 3री आयडब्ल्यूएस सिंगापूर आंतरराष्ट्रीय जलरंग स्पर्धा व प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहे. या चित्रात आकाश आणि पृथ्वी यांच्यातील नाट्यमय क्षण प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. सोनेरी पिवळा, मऊ निळा आणि अग्निमय केशरी रंगांनी सजलेले आकाश जांभळ्या व राखाडी छटांमध्ये विरघळताना दिसते. प्रकाश आणि सावलीचा खेळ चित्राला सखोल भावनिक परिणाम देतो. खालील भागात मातीचा तपकिरी रंग, पाण्यातील शांत प्रतिबिंब, लहान शिडाच्या बोटी आणि विखुरलेले पक्षी जीवन आणि हालचालीचे प्रतीक ठरतात. ही कलाकृती कागदावर जलरंग माध्यमात साकारण्यात आली आहे.
वरद गावंड हे प्रामुख्याने निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे आणि लाईव्ह पेंटिंगसाठी ओळखले जातात. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाची भव्यता आणि मानवी भावना यांचा सुरेख संगम दिसून येतो. सामाजिक जागरूकता, समानता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या विषयांवर ते आपल्या कलेतून भाष्य करतात. त्यांच्या या यशामागे देवरुख कॉलेज ऑफ फाईन आर्टचे प्राचार्य रणजीत मराठे, संस्थापक अजय पित्रे तसेच प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. कॉलेज प्रशासनाने वरद यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यापूर्वीही वरद यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, कर्नाटक चित्रकला परिषद, बेंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात तसेच पुणे आर्ट फिएस्टा 2025 या सामूहिक प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतींची निवड होऊन विशेष सन्मान मिळाला आहे.






