डिजिटल पेपरलेस शालेय बँक; विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता विकसित
| खरोशी | प्रतिनिधी |
गागोदे बुद्रुक येथील मायनी कोयना केंद्राची रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे डिजिटल व पेपरलेस शालेय बँक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाची तंत्रस्नेही बँक शालेय स्तरावर कार्यान्वित करण्यात आली असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय, आर्थिक शिस्त व डिजिटल साक्षरता विकसित होत आहे.
शालेय बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे संपूर्ण कामकाज डिजिटल पद्धतीने चालते. या बँकेत शाखाधिकारी म्हणून इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आर्या पवार ही जबाबदारी सांभाळत असून, इतर विद्यार्थीही विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. विद्यार्थ्यांनी डिजिटल सुविधेद्वारे पैसे जमा केल्यानंतर पालकांच्या मोबाईलवर त्वरित संदेश जातो, तसेच एक लिंक पाठवली जाते. त्या लिंकद्वारे पालक घरबसल्या आपल्या पाल्याच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची सविस्तर माहिती पाहू शकतात. त्याचबरोबर, एखाद्या खातेदार विद्यार्थ्याने बँकेतून कर्ज स्वरूपात रक्कम घेतल्यास, ज्या दिवशी परतफेड करायची आहे त्या दिवशी पालकांना आपोआप रिमाइंडर मेसेज पाठवला जातो. बँकेतील सर्व व्यवहारांची माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येत असल्याने पारदर्शकता व विश्वासार्हता अधिक वाढली आहे.
या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बचतीची आवड निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी बाहेरचे आरोग्याला हानिकारक ठरणारे खाऊ न खाता ते पैसे बँकेत जमा करत असल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. आर्थिक व्यवहारांची समज, नियोजन, जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या बँकेमुळे मिळत आहे. हा उपक्रम तंत्रस्नेही शिक्षक रामकृष्ण भोईर यांच्या कल्पकतेतून साकार झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व शिक्षक अमित महागावकर व मंगेश पाटील यांच्या सहाय्याने शालेय स्तरावर डिजिटल बँकिंगसारखी संकल्पना यशस्वीपणे राबवली जात आहे. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख दत्तात्रेय कोठेकर, शिक्षण विस्तार अधिकारी अरुणादेवी मोरे तसेच गटशिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे यांनी विशेष कौतुक केले आहे.
मायनी कोयना शाळेने राबवलेली डिजिटल पेपरलेस बँक ही काळाची गरज ओळखणारी आणि विद्यार्थ्यांना भविष्याच्या दिशेने नेणारी उपक्रमशील संकल्पना आहे. इतर शाळांसाठीही हा आदर्श ठरेल.
-शर्मिला शेंडे,
गटशिक्षणाधिकारी, पेण







