| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सध्या पावसाळी विश्रांती घेत आहे. या मिनीट्रेनचा पावसाळी सुट्टीनंतरचा हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. मात्र, पावसाळी असलेल्या या मार्गावर अचानक झालेल्या मुसळाधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मिनीट्रेनच्या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत.
ब्रिटिश काळात सुरु झालेली नेरळ- माथेरान मिनीट्रेन ब्रिटिश काळापासून पावसाळ्यात माथेरान डोंगरात होणारा पाऊस आणि त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक बंद असते. दुसरीकडे जूनपासून 15 ऑक्टोबर या कालावधीत मिनीट्रेन मार्गावर दुरुस्तीची कामे रेल्वे कडून केली जात असतात. पावसाळ्यात माथेरान असलेल्या घनदाट अरण्य यामुळे 5000 मिली पाऊस पडत असतो. त्यामुळे घाटात मोठ्या दरडी कोसळून मिनीट्रेन मार्ग आणि नेरळ- माथेरान घाटरोड यांचे नुकसान होत असते. यावर्षी गेली तीन महिने मिनीट्रेन मार्गावर दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्यात आली होती. परंतु, मागील काही दिवस गायब झालेला पाऊस काल अचानक कोसळला आहे. या पावसाने मोठे नुकसान माथेरान घाटात मिनीट्रेन मार्गावर झाले आहे.
मिनीट्रेनच्या नेरळ- माथेरान नॅरोगेज 142 या वळणावर मोठ्या प्रमाणात डोंगरातील माती आणि दगड कोसळून मिनीट्रेन मार्गावर पडले आहेत. त्या ठिकाणी मातीसोबत एक भाला मोठा दगड मिनीट्रेन मार्गावर येऊन थांबला आहे. या दगडांमुळे रेल्वे कामगारांना कसरत करावी लागणार असून, हा दगड नॅरोगेज मार्गावर बाजूला करण्याचे काम रेल्वे कर्मचारी करीत आहेत. त्यासाठी मिनीट्रेन मार्गावर नेरळ येथून मालवाहू गाडी सोडली जात आहे. दगड बाजूला करून नॅरोगेज मार्ग सुस्थितीत करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य नेण्यासाठी या मालवाहू गाडीमधून साहित्याची ने आन सुरु आहे.







