| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत अपघातांचे सत्र सुरूच आहे. वडाळा परिसरातहिट अँड रनची घटना घडली आहे. वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजजवळ एका कारनं चार वर्षाच्या मुलाला चिरडलं आणि तेथून पलायन केलं. या अपघातात निष्पाप मुलाचा अंत झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष लक्ष्मण किनवडे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. आयुष हा त्याच्या आई वडिलांसोबत वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजजवळील फूटपाथवर राहत होता. त्याचे वडील मजूर आहेत. चारचाकी चालवणाऱ्या आरोपीचे नाव भूषण संदीप गोळे आहे. तो विलेपार्ले येथील रहिवासी आहे. तो ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. शनिवारी (दि.21) सायंकाळी आरोपी भूषण संदीप गोळे आंबेडकर कॉलेज जवळील परिसरात यु-टुर्न घेत होता, त्याच वेळी आयुष गाडीच्या चाकाखाली आला. या अपघातात चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला ताताडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आयुषला मृत घोषित केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी भूषणला अटक केली आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.