। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दादागिरी करीत आहेत. मात्र, भाजपच्या गुंडगिरीला संविधानाच्या मार्गाने चोख उत्तर देऊ, असा इशारा काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
संसदेच्या अधिवेशनाचे सूप वाजताच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि.21) मुंबईत दाखल होत मुंबई कार्यालयाची पाहणी केली व कार्यालयातील कर्मचारी व पदाधिकार्यांकडून हल्ल्याची माहिती घेतली. त्यानंतर दक्षिण मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष मंदार पवार व इतर जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची जी.टी. रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्या म्हणाल्या की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बाबासाहेबांबद्दलचे विधान चुकीचे आणि अक्षम्य आहे, त्याबद्दल त्यांनी माफीही मागितलेली नाही. यातच मुंबईतील काँग्रेस कार्यालय हल्ला प्रकरण पोलिसांनी हे गंभीरपणे हाताळले नाही. हल्लेखोरांना ताब्यात घेऊन सोडून दिले व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधातच खोट्या आरोपाखाली केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस अशा हल्ल्याला घाबरत नाही. भाजपच्या गुंडगिरीला संविधानाच्या मार्गाने चोख उत्तर देऊ, असे त्या म्हणाल्या.