। मुंबई । प्रतिनिधी ।
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे होर्डिंग कोसळून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी होर्डिंग सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. अशा घटना केवळ अपघात म्हणून न पाहता भविष्यात त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार तांबे यांनी राशीनसह, घाटकोपर आणि किवळे येथे यापूर्वी घडलेल्या होर्डिंग दुर्घटनांचा उल्लेख केला. वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमधून प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक धडे घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संभाव्य धोके आधीच ओळखून उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, त्यांच्या सुरक्षिततेची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.






