। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतातील बंदर व गोदी कामगारांचा वेतन करार 27 सप्टेंबर रोजी झाला असून, या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी 2025 पासून होणार आहे. असे ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस.के. शेट्ये यांनी सांगितले आहे.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील आउटडोअर डॉक स्टाफच्यावतीने शुक्रवारी (दि.20)इंदिरा गोदीतील हमालेज बिल्डिंगमधील स्टाफ ऑफिस कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, गोदी कामगारांनी निदर्शनासारखी अनेक आंदोलने करून संपाची धमकी दिल्यानंतर गोदी त्यांच्या एकजुटीमुळे 1 जानेवारी 2022 पासून लागू होणारा वेतन करार संपन्न झाला. आता गोदीमध्ये कायम कामगारांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांना संघटित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, दत्ता खेसे, मारुती विश्वासराव, बबन मेटे, प्रबंधक स्वामी, मिलिंद घनकुटकर, विजय सोमा सावंत यांसह विजय रणदिवे, मनीष पाटील, आप्पा भोसले, बापू घाडीगावकर, प्रदीप गोलतकर, पसंदीप घागरे व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.