। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण पश्चिमेतील योगीधाममधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीचे प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि सोसायटीमधील रहिवाशांनी कल्याण परिमंडल 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेण्यात आली. यावेळी, मारहाण करणार्या अखिलेश शुक्ला याला त्वरित अटक करून त्याचे निलंबन करण्यात यावे. तसेच, गुन्हा दाखल करण्यास उशीर करणार्या एपीआय लांडगे यांचे देखील निलंबन करा आदी मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.
भेटीदरम्यान, आरोपीला अटक न केल्यास उद्या दुकाने बंद करून कल्याण-मुरबाड रस्ता बंद करणार असल्याचा इशारा यावेळी पोलिसांना देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात मनसेचे उल्हास भोईर, कस्तूरी देसाई, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विजय साळवी, रुपेश भोईर, माय मराठी प्रतिष्ठानचे नितीन जाधव, अतुल सरगर, योगीधाम व्यापारी संघटनेचे उमेश वाघ, शिवसेनेचे अरविंद मोरे, छाया वाघमारे, नेत्रा उगले, गणेश जाधव, अनघा देवळेकर, मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जोगदंड आदींसह प्रमुख पदाधिकारी यांच्यासह योगीधाम येथील स्थानिक नागरिकही उपस्थित होते.