14 मार्च रोजी लोक अदालतीचे आयोजन
| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांना प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणे, वीज बिलाबाबतचे वाद तसेच वीज चोरीसंदर्भातील दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने सोडविण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित ग्राहकांनी शनिवार, 14 मार्च रोजी तालुका न्यायालय स्तरावर आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये 14 मार्च रोजी सकाळपासून राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून वीज ग्राहकांना थकबाकी आणि वादग्रस्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी मिळणार आहे. महावितरणच्या माहितीनुसार, कल्याण मंडळ-1 अंतर्गत सुमारे 2,500 वीज ग्राहकांकडे 7.58 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर कल्याण मंडळ-2 अंतर्गत 1 लाख 18 हजार 227 ग्राहकांकडे तब्बल 154 कोटी रुपये थकीत आहेत. वसई मंडळातील 1 लाख 10 हजार 359 ग्राहकांकडे 111 कोटी रुपये तर पालघर मंडळातील 7,659 ग्राहकांकडे 47 कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशाप्रकारे या परिमंडलात एकूण सुमारे 320 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
या परिमंडलातील कल्याण मंडळ-1, कल्याण मंडळ-2, वसई आणि पालघर मंडळातील सुमारे 2 लाख 38 हजार वीज ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी विधी विभागामार्फत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ज्यांना नोटिस मिळाली नसेल त्यांनीही संबंधित तालुका न्यायालयात हजर राहून आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येणार आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून वीज ग्राहकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याणच्या उपमुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.







