| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेचा कारभार सध्या अक्षरशः बेजबाबदार प्रशासनाच्या ताब्यात गेला असून गेल्या तब्बल 10 ते 15 दिवसांपासून मुख्याधिकारी रजेवर आणि प्रभारी अधिकारी बेपत्ता असल्याचे संतप्त चित्र समोर आले आहे. मुख्याधिकारी समीर जाधव रजेवर गेल्यापासून नगरपरिषदेची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपविण्यात आली, ते प्रभारी अधिकारी आजतागायत कार्यालयात आलेलेच नाहीत, अशी गंभीर तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनही उचलला जात नसल्याने प्रशासनाचा कारभार कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे.
उरण नगरपारिषदेत आधीच सत्तांतरानंतर राजकीय तणाव निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर असून नगरसेवकांचे बहुमत भाजपकडे आहे. या सत्तासंघर्षात विकासकामे रखडली असताना आता प्रशासनच गायब झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत समस्यांचा ढिग वाढत असताना निर्णय घेणारे अधिकारीच नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या दरम्यान, 10-15 दिवस झाले, ना मुख्याधिकारी दिसले ना प्रभारी. मग नगरपरिषदेचा कारभार चालवतोय कोण? असा संतप्त सवाल उरणकर उपस्थित करत आहेत.







